सत्तावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार “राष्ट्रवादी” ठरणार किंग…!

0
173

मुंबई प्रतिनिधी: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सभागृहातील चिंता दूर झाली आहे. मात्र असं असलं तरीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच मंत्रिपदांबाबतचा नवा फॉर्म्युला आता समोर आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तसंच यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा समावेश असणार आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तीन नंबरला असणाऱ्या काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील, अशी माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहणार असले तरीही खरी पॉवर राष्ट्रवादीकडेच राहील असं चित्र आहे.

राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार हे तीन नेते आघाडीवर आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. कारण राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे. त्यामुळे सरकारला स्थिरता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here