विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड…!

0
133

मुंबई प्रतिनिधी: भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. विधानसभा अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला शिवसेनचे विधीमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते.

विधीमंडळात बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर भाजप उमदेवार किसन कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, हे निश्चित झालं आहे.

‘विधानसभा अध्यक्षांची आणि विधानपरिषदेच्या सभापतींची निवड ही सर्वसाधारणपणे एकमताने होत असते आणि आजही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ही एक मताने व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. त्या दिशेने आमचा प्रयत्न सुरू आहे आम्हाला आशा आहे की अशाच पद्धतीने ही निवड होईल,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी दिली होती.

दरम्यान, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते निवडीबाबतची अधिकृत घोषणा लांबणीवर पडणार आहे. येत्या 16 ते 21 डिसेंबरदरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. यावेळी ही घोषणा विधानसभा अध्यक्ष करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्याची निवड होईल, अशी अपेक्षा होती. पण कामकाज पत्रिकेत याबाबत उल्लेख नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड लांबणीवर पडली आहे.विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here