भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले……

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १८७व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४०मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.

सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केले. १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. काही धर्ममार्तंडांनी ‘धर्म बुडाला’ अशी ओरड केली व सावित्रीबाईंवर धर्मबुडवी म्हणून ते शेणमाती, दगड फेकू लागले. तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. अस्पृश्यांना शिकविल्यामुळे सनातनी मंडळी जास्तच चिडली. त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना घराबाहेर पडणे भाग पडले. अशाही परिस्थितीत सावित्री मुळीच डगमगली नाही. ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याची तयारी केली होती. सावित्रीबाई फुले अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. इस १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले. शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात…