विधानसभा निवडणुका १५ते२० ऑक्टोबर दरम्यान होतील: चंद्रकांतदादा पाटील

0
171

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय तळ ढवळून निघाला आहे. नेत्यांत्या पक्षांतराबरोबर राजकीय कुरघोड्याही वाढल्याचे दिसत आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची चिन्हे असल्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, अशी माहिती दिली आहे.

भाजपाची कोअर कमिटीची बैठक मुंबईत सोमवारी पार पडली. सुमारे सात चाललेल्या बैठकीत आगामी निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. राज्यात १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील”, अशी माहिती त्यांनी दिली. युतीच्या जागा वाटपाच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, “युतीच्या जागा वाटपाचा निर्णय भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेणार आहेत. युतीच्या जागावाटपाच्या सूत्रावर पुढील आठवड्यात निर्णय होईल. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील जागांचा आढावा घेण्यात आला. जागा वाटपाच्या बोलणीचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे”, असे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याने राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणूक होणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय आरोपप्रत्यारोपांना आणखी धार येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here