कोल्हापूर,सांगलीतील वीजदेयक भरण्यास मुदतवाढ- संजीव कुमार

0
257

कोल्हापूर प्रतिनिधी: महापुरामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणने युद्धपातळीवर पूर्ववत केल्याने पूरग्रस्त भागात जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. कोल्हापूर शहरातील 99 टक्के तर सांगली शहरातील 98 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, ग्रामीण भागातीलही 90 टक्के वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. तसेच पुरामुळे अनेकांना वीजबिल भरता न आल्याने पूरग्रस्त भागातील लघुदाब ग्राहकांना देयक भरण्यास 1 महिना तर उच्चदाब ग्राहकांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी येथे दिली.
गेली दोन दिवस महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू कोल्हापूर व सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. प्राथमिक अंदाजानुसार महावितरणचे कोल्हापूर जिल्ह्यात 49 कोटी तर सांगलीत 47 कोटी असे 116 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सहा हजारांवर रोहित्रांना त्याचा फटका बसला. 42 उपकेंद्र पुरामुळे बंद पडली होती. कोल्हापुरातील नागाळा पार्क, दुधाळी तर सांगलीतील कोल्हापूररोड व शेरीनाला उपकेंद्राला तसेच दोन्ही शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेटून महावितरणने केलेल्या कामांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ त्यांनी जाणून घेतला. दोन्ही ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसोबत समुह भोजन घेत संवाद साधत असेच काम कायम करत राहण्याचे आवाहनही केले.
पुढे बोलताना संजीव कुमार म्हणाले, अशी नैसर्गिक आपत्ती दुर्दैवाने कधी ओढावू नये. तरीही आपण आपत्कालिन परिस्थितीसाठी सज्ज असले पाहिजे. ज्या वाहिन्यांना पुराचा फटका बसला, त्या वाहिन्यांची उंची वाढवण्यासाठी ‘मोनो टॉवर’ उभारण्याचे व उपकेंद्रांना उंच भागात नव्याने जागा शोधून तसा नियोजन आराखडा बनविण्याचे आदेशही त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई व मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनीही संजीव कुमार यांची भेट घेतली. महावितरणने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा तातडीने सुरू केला. त्याबद्दल सर्वांनी संजीव कुमार यांचे आभार मानले.
पुरामुळे नादुरुस्त झालेले मीटर, रोहित्र, खांब बदलण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व मनुष्यबळ ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व संजीव कुमार यांनी तातडीने कोल्हापूरला रवाना केले. ज्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वीज यंत्रणा गतिमान झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील 26 उपकेंद्र बाधित झाले होते. आज रोजी सर्व उपकेंद्र सुरू असून सांगलीतील 16 पैकी बालाजी मंदीर, शेरीनाला व पणुंद्रे ही उपकेंद्रे वीज वाहिन्या पुरामुळे बाधित झाल्याने बंद आहेत. उद्या उशिरापर्यंत ही उपकेंद्रेही सुरु होतील. सबंध दौऱ्यात प्रादेशिक संचालक सुनील पावडे व मुख्य अभियंता अनिल भोसले, माध्यम सल्लागार पी.एस. पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here