‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक

323

कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित स्वच्छता महोत्सवामध्ये अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी हे पारितोषिक स्वीकारले.

स्वच्छता व पेयजल विभागाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, सचिव परमेश्वर आयर, अतिरिक्त सचिव अरुण बरोका यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात पहिला, तर भारत देशात दुसरा क्रमांक पटकाविला.
वैयक्तिक तसेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रांतील सार्वजनिक शौचालय रंगविण्याच्या या व्यापक मोहिमेमध्ये सर्व स्तरावरील लोकसहभाग व शासकीय यंत्रणांचे योगदान मिळावे यासाठी दिनांक २८ जानेवारी २०१९ हा दिवस ‘एक दिवस शौचालयासाठी’ म्हणून घोषित करण्यात आला होता. यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ४,३१,५८४ इतकी वैयक्तिक शौचालये रंगविण्यात आली. तसेच ८,४१९ इतकी सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालये रंगविण्यात आली.