सावर्डे तर्फ असंडोली येथील अभियंता अतिश गिरीबुवाच्या मृत्यूस जबाबदारांवर कारवाईचे निवेदन

0
225

कळे : सावर्डे तर्फ असंडोली (ता.पन्हाळा) येथील अतिश रवींद्र गिरीबुवा या अभियंत्याच्या आत्महत्येस जबाबदार कोल्हापूर येथील बांधकाम व्यावसायिक गिरीश शहा व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा अतिशच्या नातेवाईकांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन कळे पोलीस ठाण्यात देण्यात आले.
अतिश गिरीबुवा हा अभियंता गेली तीन महिन्यांपासून कोल्हापूर येथील बांधकाम व्यवसायिक गिरीश शहा यांच्याकडे कामाला होता. त्यांच्या सांगली येथील बांधकामावर तो सुपरवायझर होता.दरम्यान,गिरीश शहा याने त्याच्याकडे कामासाठी काही रक्कम दिली होती.या हिशेबावरून गुरुवारी(ता.६) शहा याने अतिशला हॉकी स्टीकने मारहाण केली होती. यावरून अतिशने कीटकनाशक प्राशन केले होते. याबाबत मारहाणीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. उपचारादरम्यान शनिवारी(ता.८) अतिषचा मृत्यू झाला. गिरीश शहाला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. जुना राजवाडा पोलिसांनी त्यांची समजूत काढून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शहावर दाखल करण्यात आला. दरम्यान,गिरीश शहा व त्याच्या साथीदारांनी अतिषचा खून केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी मल्हारपेठ ,सावर्डे ,मोरेवाडीचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here