मोबाईलचा स्फोट होऊन उंदरवाडी येथील तरुणाचा डोळा निकामी पालकांनी घेतला धसका

0
661

गारगोटी-प्रतिनिधी
मोबाईलवर  गेम खेळताना मोबाईल गरम होउन स्फोट झाला, आणि मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने डोळाच निकामी झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली.

कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील अमोल दत्तात्रय पाटील ( वय १६) हा दोन मोबाईलवर गेम खेळत बसला होता. बराच वेळ गेम खेळत बसल्याने मोबाईल गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. या मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने अमोलचा डोळाच निकामी झाला आहे.

या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून मुलांच्या हातून मोबाईल काढून घेणे आणि त्याच्या वापरास मज्जाव करण्याचा आग्रह पालक धरताना दिसून येत आहेत.

अमोलने सरवडे येथील खोराटे विद्यालयातून १० वीची परीक्षा दिली आहे. त्याचा लवकरच निकाल लागणार आहे. हुशार अमोलला पालकांनी जादा क्लाससाठी के.पी.पाटील शैक्षणिक संकुलात दाखल केले आहे. बुधवारी घरातील सर्वजण भैरीचे पठार येथे शेतीकामासाठी गेले होते. सकाळी १० च्या सुमारास अमोलने जनावरांना वैरण घातली आणि तेथेच मोबाईलवर गेम खेळत बसला.

थोड्या वेळाने मोबाईल गरम झाला आणि स्फोट झाला, तेव्हा त्या मोबाईल मधील एक लांब तुकडा त्याच्या डाव्या डोळ्यात घुसला. वेदना होत झाल्याने शेजारील लोकांनी वडिलांना कळवले. वडील शेतातून आल्यावर अमोलला कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील नेत्ररोग तज्ञांनी तत्काळ शस्रक्रिया करुन तो तुकडा काढला, मात्र डोळा निकामी झाल्याचे सांगितले.

अमोलला घरी आणले आहे. शांत व हुशार अमोलचा मोबाईलमुळे एका डोळ्याने दिसणे बंद झाले. यापुढे अभ्यासामध्ये अडथळा जाणवणार आहे, याचे वडिलांना मोठे दु:ख झाले आहे. दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश मिळणारच या अपेक्षेने त्याने पुढील शिक्षणासाठी ५५ हजार रुपये फी भरुन खासगी क्लास सुरु ठेवला आहे. पण हुशार अमोलचा डोळा मोबाईलमुळे निकामी झाल्याने घरच्यांनाही मानसिक धक्का बसला आहे. संबंधित मोबाईल कंपनी विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे अमोलचे वडील दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.

पालकांनी घेतला धसका

मोबाईलचा स्फोट होऊन अगदी जवळच ही दुर्घटना घडल्याने याचे पडसाद तत्काळ जिल्हाभर उमटले आहेत. अनेक पालकांनी मुलांच्या कडून मोबाईल काढून घेतले, तर अनेकांनी पै-पाहुणे, मित्र परिवार यांना फोनवरुन या घटनेची कल्पना दिली, व सावधानतेचा इशारा दिला.

मोबाईलचा स्फोट झाल्याने त्यातील लोखंडी धातूचा तुकडा डाव्या डोळ्याखालच्या पापनीतून घुसून मुख्य नसापर्यत पोहोचला. त्यामुळे ती नस तुटून डोळ्याला इजा झाली. डोळा संपूर्णपणे निकामी झाला असल्याने त्याला दिसणे बंद झाले आहे. फक्त शस्त्रक्रियामुळे त्याला दिसत नाही हे ओळखून येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here