पेट्रोल ,डिझेल दरवाढी पाठोपाठ गाड्यांचा विमाही महागणार

0
178

कणकवली :-लोकसभा निवडणूक आटोपताच झालेल्या इंधन दरवाढी पाठोपाठ आता वाहनांच्या विमा रकमेतही वाढ करण्याचा निर्णय विमा नियमक व विकास प्राधिकरण (इर्डा) ने घेतला आहे. प्रस्तावित दरवाढीनुसार वाहनांच्या क्षमतेनुसार 10 ते 20 टक्के एवढी वाढ विचाराधीन असल्याचे ‘इर्डा’ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सहाजिकच याचा थेट फटका वाहतूक व्यवसायाला बसणार आहे.

‘इर्डा’ने जारी केलेल्या पत्रकानुसार दुचाकी, चारचाकी गाड्या, खासगी टॅक्सी, ट्रक, बस आदींच्या थर्ड पार्टी विमा हप्त्यामध्ये 10 ते 20 टक्क्याने वाढ होणार आहे. यामुळे दुचाकीच्या विमा हप्त्यात वार्षिक 30 ते 200 रू. तर कार, जीप व अन्य चारचाकींच्या विमा हप्त्यात 300 ते 450 रु. एवढी वाढ होण्याची चिन्हे आहेत. खरेतर ‘इर्डा’ कडून दरवर्षी 1 एप्रिलला विमा हप्त्याचे दर जाहीर केले जातात. मात्र, यावर्षी निवडणूक कालावधी विचारात घेऊन ही वाढ जाहीर झालेली नव्हती. यामुळे यावर्षी वाहनांच्या विम्यात वाढ होणार नाही, अशी समजूत वाहनचालक व व्यवसायिकांची होती. मात्र, हा दिलासा अल्पजीवी ठरला असून निवडणुका आटोपताच ‘इर्डा’ने वाहन विम्याचे नवे धोरण जाहीर केले आहे.
चालू विमा दरानुसार 1 हजार सीसी इंजिन क्षमतेच्या कार व चारचाकी वाहनांसाठी 1 हजार 850 रू. एवढा विमा हप्ता होता. दरवाढीनंतर हाच हप्ता किमान 2 हजार 120 रू. एवढा होणार आहे, तर 1 हजार ते 1500 सीसी इंजिन क्षमतेच्या वाहनांसाठी असलेला 2 हजार 863 रू. एवढा हप्ता 3300 रू. होणार आहे. दुचाकी वाहनांमध्ये 75 सीसी पर्यंत 427 रूपयांवरून 482 रु. विमा हप्ता होणार आहे, तर 75 ते 150 सीसीपर्यंत इंजिन क्षमता असलेल्या दुचाकीसाठी सध्या 720 रु. विमा हप्ता असून तो 752 रू. होणार आहे. 150 ते 350 सीसी क्षमतेच्या दुचाकींसाठी ही वाढ 985 वरून 1 हजार 193 रु. होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here