हातकणंगलेकडे राज्याचे लक्ष : शेट्टींची हॅट्रीक की धैर्यशिल मानेंची एन्ट्री

0
217

जयसिंगपूर : लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले असून निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. खासदार राजू शेट्टी तिसऱ्यादा खासदारकीवर हॅट्रीक करणार कि धैर्यशिल माने यांच्या रुपाने माने घराण्यातील तिसरी व्यक्ती खासदारकीचा मुकूट चढविणार याकडे हातकणंगले लोकसभा मतदार संघासह राज्याचे लक्ष वेधले आहे. 

राज्यातील एक चुरशीची लढत म्हणून हातकणंगले लोकसभा मतदार संघाकडे पाहिले जात आहे. ऊस दराच्या चळवळीतून पुढे आलेल्या खासदार शेट्टी यांच्यापुढे नवखे उमेदवार धैर्यशिल माने यांनी तगडे आव्हान निर्माण केले. माने यांच्या उमेदवारीनंतर एकतर्फी निवडणूकीचे भाकित सांगणारे आज निकालावरुन संभ्रमात आहेत. धैर्यशील माने जरी सेनेचे उमेदवार असले तरी भाजपनेही त्यांना पूर्ण ताकद दिली आहे. त्यामुळे निवडणूकीत कमालीची चुरस निर्माण होऊ शकली. 

संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला दिडपट हमीभाव या दोन मुद्यांवर खासदार शेट्टींनी भाजपशी काडीमोड घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. गेल्या तीन वर्षात खासदार शेट्टींनी पंतप्रधान मोदींना टिकेचे लक्ष केल्याने लोकसभेच्या मैदानात याचा हिशोब करण्याचा चंग भाजप नेत्यांनी बांधला. माजी खासदार स्व. बाळासाहेब माने याचे नातू व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे सुपुत्र इतकीच काय ती धैर्यशिल माने यांची ओळख. मात्र, निवडणूकीच्या प्रचारात त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी तरुणाईला जिंकले. 

एका बाजूला राज्यात आणि देशात वलय निर्माण केलेले खासदार शेट्टी आणि दुसरीकडे नवखे असणारे धैर्यशिल माने यांच्यातील झुंज मात्र निकालावरुन गुंता निर्माण करणारी ठरली आहे. खासदार समर्थक व माने समर्थकांनी आपापल्या सोयीची आकडेमोड केली असली तरी पडद्यामागील झालेल्या अनेक घडामोडी लक्षात घेतल्या तर मतदार संघातील निकाल काय लागू शकतो याबाबत छातीठोकपणे सांगणे कठीण बनले आहे. 

बहुतांश साखर कारखानदारांनी शेट्टींचा प्रचार केला तर दुसरीकडे स्वाभिमानीतील नाराज गटासह सेना-भाजपचे आमदार, मंत्री यांनी शेट्टींच्या पाडावासाठी पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजून काढला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीने मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलल्याने निकालाचा गुंता आणखी वाढला असून प्रचारात वारं कुणाचं हे छातीठोकपणे सांगणारे राजकीय विश्‍लेषक निकालावरुन मात्र तोंडात बोटे घालताना दिसत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here