कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपये पाण्यात ; गावे तहानलेलीच

0
578

कोल्हापूर प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्हा समृद्ध आहे पण शासनाच्या पाणी पुरवठा आणि त्याच्याशी संबंधित भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी योग्य प्रकारे कामकाज केले नसल्याने जिल्ह्यातील शेकडो गावे तहानलेलीच आहेत. या गावातील महिलांना रात्रंदिवस पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शासन जनतेला पाणी मिळावे म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करत असताना हा निधी कुठे मुरला गेला याची चौकशीची मागणी जनतेतून होत आहे.

जिल्ह्यात पाण्याचा मुबलक साठा आहे. राधानगरी , काळम्मावाडी या धरणामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्या विहिरीतून हे पाणी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पाणीपुरवठा विभागाचे आहे पण या विभागाने पाणी योजनांची पूर्तता केली नाही, अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत, अनेक योजना गळक्या आहेत. त्यामुळे जनतेला पाणी मिळत नाही.नळ योजनेबरोबरच लोकांना विंधन विहिरीतून पाणी दिले जाते. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी किती आहे ही माहिती शास्त्रोक्त पद्धतीने देण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा या विभागाची आहे. त्यांच्याकडून पाणीपातळी तपासणीचा फार्स केला जातो. या खात्याकडून योग्य अहवाल मिळत नसल्याने विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. लाखो रुपये खर्च करूनही लोकांना पाणी-पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे तरीही पाणीटंचाई का ? शासनाचे या कामावर खर्च झालेले कोट्यावधी रुपये गेले कुठे ? याची चौकशी व्हावी अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. चौकशी झाली नाही तर या संघटना वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here