किल्ले भुदरगडावरील सुचनाफलक अज्ञातांनी काढले , भुदरगड प्रतिष्ठाणची कारवाईची मागणी

0
482

गारगोटी -प्रतिनिधी
भुदरगडावरील वाईट प्रवृत्तींना आळा बसवण्यासाठी भुदरगड प्रतिष्ठानने सुचनाफलक लावले होते हे फलक अज्ञात लोकांनी काढले आहेत .या लोकांवर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे यांनी केली आहे.
भुदरगड प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेतर्फे गेली तीन वर्षे किल्ले भुदरगडच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबीर अशी विधायक कामे भुदरगड प्रतिष्ठानने केलीच पण भुदरगडावरील मद्यपान व इतर पार्ट्या तसेच प्रेमीयुगीलांचे अनैतिक चाळे अश्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध कठोर भूमिका घेऊन त्या बंदही केल्या. अनेकवेळा प्रतिष्ठानने स्वच्छता मोहीम घेतली की काही दिवसांनी पुन्हा आहे तशी अस्वस्थता व्हायची. याला वचक बसावा म्हणून भुदरगड प्रतिष्ठानने स्वखर्चाने काही सुचनाफलक लावले होते. या सुचनाफलकामुळे वाईट प्रवृत्तींना आळा बसला होता.
भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे हे गावी गेले की गडावर एकदा तरी जाऊन येतात. काही दिवसांपुर्वी गडावर फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की गडावरील सर्व सुचनाफलक अज्ञातांनी काढले आहेत. या गोष्टीचा त्यांनी सोशल मीडियावर तीव्र निषेधही केला होता. यावेळी भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘गेली तीन वर्षे किल्ले भुदरगडला प्रेरणास्थान मानून आम्ही गडाच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवतो आहोत. गडावरील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आम्ही लावलेले सुचनाफलक काढले आहेत. आजपर्यंत पाळलेला संयम सुटला आहे. लवकरच या विरुद्ध आम्ही धडक कारवाई करणार आहोत.’
याआधीही भुदरगडर रक्तदान शिबीर सारख्या विधायक कामांना काही लोकांनी विरोध केला होता पण दयानंद भोईटे यांनी या विरोधाला न जुमानता भुदरगडावर रक्तदान शिबीर यशस्वी करून दाखवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here