“बाळूमामांच्या नावानं चांगभलं”मालिकेत उजळाईवाडीचा नवनाथ श्रीमंदिलकर

0
1267

उचगाव (प्रतिनिधी) : उजळाईवाडी (ता.करवीर) येथील मालिका कलाकार नवनाथ दिलीप श्रीमंदिलकर “बाळूमामांच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये चमकत आहे. उजळाईवाडी येथील रहिवासी असलेल्या या तरुणास राज्यात सध्या गाजत असलेल्या “बाळूमामांच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे . सध्या नवनाथ या मालिकेमध्ये “नान्या” ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. त्याच्या भूमिकेमुळे उजळाईवाडीचे नाव परिसरात गाजत असून या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवनाथ दिलीप श्रीमंदिलकर असे या तरुणाचे नाव आहे. नवनाथला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पाच वर्षांपूर्वीच वडिलांच छत्र हरपलं. मागे आई व एक लहान भाऊ, घरची परिस्थिती तशी बेताचीच. अशा परिस्थितीत नवनाथने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम केले .खूप साऱ्या ठिकाणी जाऊन ऑडिशन दिल्या . नोकरी सांभाळून नाटक, शॉर्ट फिल्म, फिल्ममध्ये नवनाथ ने आपल्या अभिनयाला वाव मिळावा म्हणून सतत मेहनत केली. पण या अपार मेहनतीनंतर नवनाथला पहिली संधी मिळाली टीव्हीवर झळकण्याची. तीही झी मराठीवर. झी मराठीवरील “तुझात जिव रंगला” या मालिकेमध्ये नवनाथला एक दिवसाचा रॅगिंग करणा-या विद्यार्थ्याचा रोल मिळाला. परंतु त्यानंतर म्हणावं तसं काम मिळत नव्हतं. शेवटी नवनाथचा मित्र सागर दळवी व संतोष कदम यांनी त्याला मुंबईला जाण्यासाठी सुचवले व त्याला प्रोत्साहन दिले. यामध्ये त्याची आई व त्याच्या भावाचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सुद्धा त्याला यासाठी पाठिंबा दिला. त्यानंतर नवनाथने मागे वळून पाहिले नाही. त्याने नोकरी सोडली व थेट मुंबई गाठली. तिथे गेल्यावर सुद्धा त्याला स्ट्रगल चुकला नाही. तिथे सुद्धा नवनाथने विविध ठिकाणी ऑडिशन दिल्या. प्रोडक्शनला जाऊन भेटला. तिथे त्याची भेट रवी पाटील यांच्याशी झाली. रवी पाटील यांनी नवनाथला रिद्धिश गोरख पाटील यांची भेट करून दिली. रिद्धिश पाटील यांनी नवनाथची ऑडिशन पाहिली. व त्याला “बाळूमामांच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. सध्या नवनाथ कलर्स मराठीवरील “बाळूमामांच्या नावानं चांगभल” या मालिकेमध्ये “नान्या” ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. नवनाथने आत्तापर्यंत नाटक, सिनेमा, शॉर्ट फिल्म इ. मध्ये काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here