रिलायन्स ऍचिव्हर टेस्टमध्ये कोल्हापूरची मगदूम श्रृती ही राज्यात प्रथम

0
224

लातूर : लातूर रिलायन्स पॅटर्न, लातूरच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रिलायन्स ऍचिव्हर टेस्टमध्ये कोल्हापूरची मगदूम श्रृती ही राज्यातून प्रथम आलेली आहे. यानिमित्त तिला एक लाख रुपयांचा चेक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याच परीक्षेत राज्यातून द्वितीय, तृतिय आलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यवतमाळचे विख्यात लेखक हाजी शमी उल्ला खान यांच्या हस्ते बक्षीसाचे चेक आणि प्रशस्तीपत्र देऊन सम्मान करण्यात आला.
महाराष्ट्रासह देशात लातूर पॅटर्नचा दबदबा निर्माण करणार्‍या लातूरच्या रिलायन्स लातूर पॅटर्नद्वारे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आयआयटी जेईई आणि निटच्या अभ्यासक्रमावर अधारित चाचणी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा लातूर येथील रिलायन्स कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाला. महाराष्ट्रातील एकूण २१ जिल्ह्यातून घेण्यात आलेल्या या चाचणी परीक्षेत राज्यातील तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. इयत्ता ११ वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत ३२० पैकी २०८ गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावलेल्या कोल्हापुरच्या मगदूम श्रृतीला एक लाखांचे पारितोषीक देण्यात आले, तर बिरादार अबोली, लातूर हिने २०६ गुण घेतले होते. तिला द्वितीय ५१ हजार रुपयांचे पारितोषीक देण्यात आले. जयप्रकाश सलगरे, लातूर याने २०५ गुण घेऊन तृतिय क्रमांक मिळवल्याबद्दल २१ हजारांचे बक्षीस देण्यात आले. ऍचिव्हर टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये सहभाग नोंदवून यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले.
या बक्षिस वितरण आणि भव्य प्रवेश मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ओंकर होनराव, प्रमुख पाहुणे यवतमाळचे विख्यात लेखक हाजी शमी उल्ला खान आणि व्यासपिठ प्रमुख म्हणून ऍड. अ.न. नेत्रगावकर, उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. सतिश पाटील, महाविद्यालयाच्या फिडबॅक विभागाच्या आश्‍विनी कोळी, शिल्पा गायकवाड, भारत बुक्तर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सरस्वती पूजन करुन प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओंकार होनराव यांनी उपस्थित पालकांना महाविद्यालयाच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि उपलब्ध व्यवस्थांबद्दल विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती जोशी आणि निलेश देवकते यांनी केले. तर कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन घनश्याम पवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here