कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली

0
201

कोल्हापूर:
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी सध्या सुरू असलेल्या १४ किलोमीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज आक्रमक झालेल्या या परिसरातील गावकऱ्यांनी संरक्षक भिंत पाडून टाकली. एकीकडे कोल्हापूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत असताना संरक्षक भिंतीचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने उजळाईवाडी परिसरातील ग्रामस्थांनी ठेकेदाराचा निषेध करत आज संरक्षक भिंत पाडून टाकत विमानतळ प्राधिकरणाच्या निकृष्ट कामाची पोलखोल केली आहे.
कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळाचे महत्त्वाचे स्थान आहे. भूसंपादन आणि विविध प्रकारच्या परवानग्या यामध्ये अनेक वर्ष विमानतळाचा विकासाचे घोंगडे भिजत पडले होते. विमानसेवा कधी बंद तर कधी चालू अशा अनिश्चिततेच्या गर्तेत आता कुठे विमानसेवा सुरू झाली आहे. एकूण २७४ कोटी रुपये विकास निधीच्या माध्यमातून कोल्हापूरच हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ साकारले जात आहे. कामात कोणताही अडथळा नको अशीच सर्वांची भूमिका असताना सध्या मात्र ३३ कोटी रुपयांच्या संरक्षक भिंतीचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आल आहे. यामुळे आज उजळाईवाडी परिसरातल्या ग्रामस्थांनी ठेकेदार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विमानतळाची संरक्षक भिंती पाडून टाकल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने हलक्या दर्जाच्या विटा आणि वाळूचा वापर केल्यामुळे नागरिकात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसंच हे आंदोलन सुरू असताना घटनास्थळी ठेकेदार , कोल्हापूर विमानतळाचे अधिकारी दाखल झाल्याने आंदोलक आणि ठेकेदार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि वाद निर्माण झाला. निकृष्ट दर्जाचे काम कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाच्या ठेकेदाराने चोवीस तासाच्या आत पाडले नाही तर स्वतः जेसीबी घेऊन ऊजळेवाडी चे ग्रामस्थ पाडतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here