रुकडी गावचे दारूबंदीसाठी हातकणंगले पोलिस स्टेशनला निवेदन

0
323

रुकडी : वार्ताहर
रुकडी(ता. हातकणंगले ) येथे गावातील मध्यवस्तीतील दारू दुकाने, शाळा कॉलेज परिसरात दारू, गांजा याची राजरोस विक्री होत आहे. तेंव्हा गावातील संपूर्ण दारूबंदीचा निर्धार केला असुन, याबाबतचे निवेदन गावातील सर्व ग्रामस्थ, महिला यांचेवतीने सरपंच रफीक कलावंत, राष्ट्रवादी कामगार संघटनेचे उत्तम कांबळे यांनी हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक एस.एन. डूबल यांना दिले असुन, संबंधितावर कठोर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

सध्या रूकडी हे गाव जिल्हयातील लोकसंख्येने सर्वात मोठे असुन, राजकीय व सामाजिकदृष्टया संवेदनशिल म्हणून ओळखले जाते. गावात मध्यवस्तीतील बाजारपेठ, शिवाजी चौक, रेल्वे फाटक परिसरात देशी तसेच हातभट्टी दारूची दुकाने राजरोस सुरू आहेत. कांही ठराविक ठिकाणी नशेसाठी तरूण मुलांना गांजा विक्री ही होताना दिसत आहे. अगदी दहावी, बारावीत शिकणारी तरुण मुले रात्रीच्या सुमारास हायस्कूलच्या जुन्या ग्राउंडवर, मराठी शाळेच्या आवारात दारू, गांजाची ची उघडपणे नशा करताना दिसत आहेत. गावातील कांही सुज्ञ मंडळी अशा व्यसनाधिन तरुण मुलांना बऱ्याचवेळा समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याच अंगावर धावून जाणेचा कटू प्रकार अनेकांनी अनुभवला आहे. विशेषकरून यामध्ये विविध समाजातील मिसूरडे न फुटल्याली तरूण मुले दारू , मटका, गुटखा व गांजा इ. व्यसनाच्या विळख्यात सापडली आहेत. काहींनी व्यसनासाठी प्रापंचिक वस्तु ही विकल्या असुन यामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरी दारूबंदी साठी ग्रामस्थांची एकजूट होणे गरजेचे होते.

सध्या गावातील वाढत्या गुन्हेगारीला तरुणांमधील व्यसनाधीनता हेच कारण होते. यासाठी विद्यमान सरपंच रफीक कलावंत, सर्व ग्रा. पं . पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी ‘ गावातील संपूर्ण दारूबंदी चा ग्रामसभेत ठराव मंजूर केला. याकामी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे उत्तम कांबळे यांनी गावातील सर्व समाजातील कांही प्रमुख नागरीकांच्या मदतीने पुढाकार घेतला असून, त्यांनी पहिल्या टप्प्यात देशी, हातभट्टी, बीयरशॉपी व गांजा विक्री करणाऱ्यावर बंदी बरोबरच कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात हातकणंगले पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे. यात संबंधितांची सर्व माहिती सादर केली आहे. याकडे राजकीय तसेच पोलिसी वरदहस्तामुळे दिरंगाई झाल्यास, भविष्यात जिल्हा पोलिस प्रमुख मुख्यालयाच्या दारात गावातील सर्व समाजातील महिला, तरूण मंडळे, सामाजिक संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.

यावेळी हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक डूबल यांना निवेदन देताना, सरपंच रफीक कलावंत, उत्तम कांबळे, प्रिती घाटगे, सरीता कांबळे, गीता कांबळे, मनिषा कांबळे, सुरेखा भोसले इ. मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here